डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष साहित्य
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खास लेख, कविता आणि गझल
बाबासाहेब - क्रांतीचे वादळ
बाबासाहेब, तू क्रांतीचे वादळ
ज्वालाग्राही धगधगती मशाल
गीत गातो तुझ्या क्रांती पर्वाचे
आशीर्वाद द्यावा आम्हां खुशाल..... ।।१।।
सदैव तेजस्वी तू क्रांतिसूर्य
संविधानाचा तू रचनाकार
चवदार तळ्याचा आंदोलनकर्ता
तूच लोकशाहीचा शिल्पकार ..... ।।२।।
आमच्या गीतात नाव तुझेच
गातो आम्ही तुझे गुणगान
केला तू दलितांचा उद्धार
महान आहे तुझे जीवनगान..... ।।३।।
आम्ही दीनदुबळे, दलित
तूच आमचा सांभाळकर्ता
निरक्षर, अंधश्रद्धेचे पुजारी
तूच आमचा रक्षणकर्ता..... ।।४।।
आम्हांसी तू शिकविले
प्रज्ञा, शील आणि करुणा
या निर्मळ गीतातून गातो
बाबासाहेब, तू आमची प्रेरणा..... ।।५।।
परिस्थितीपुढे आम्ही लाचार
आमच्यात होत नाही सुधार
तुझ्यामुळेच समाजात मान
तू केलास दलितांचा उद्धार..... ।।६।।
बाबासाहेब, तू एक महासंग्राम
सदा आठवू तुझे कार्य प्रशस्त
सदैव आमच्या डोक्यावरी असावा
भिमा, तुझ्या कृपेचा वरदहस्त..... ।।७।।
दिव्याच्या प्रकाशात तू शिकलास
शाळेत गुरुजींनी वर्गाबाहेर बसविले
तू त्या वेळेस वर्गाबाहेर शिकला
म्हणून आज आम्हाला शिक्षण मिळाले..... ।।८।।
तूच आहेस भारताची शान
जयजयकार भिमाचा करूया
अवघ्या विश्व देई तुला मान
नाव बाबासाहेबांचे स्मरुया..... ।।९।।
खूप शिकून बनलास बॅरिस्टर
दलितांचा तू आहेस कैवारी
तुझे समतेचे विचार अंगीकारून
घेऊ आम्ही जगात भरारी..... ।।१०।।
उमा पाटील, धुळे
9404192537.
परिवर्तन
हलाखीचे जिणे दलितांचे भोगले त्यांनी
धर्मबांधवांना दिले अस्मिता भान त्यांनी
बाबासाहेबांनी घेतली दीक्षा बौध्द धर्माची
सोडली साथ निग्रहाने अत्याचारी धर्माची
तत्व मानवतेचे भावले कल्याण पिढ्यांचे
शूद्राला माणूस म्हणून सन्मानाने जिण्याचे
स्वातंत्र्य समता बंधुता तत्वे सारी बुध्दाची
अस्पृश्य समाजा कवचे दिली संविधानाची
नागपूर नगरी प्रज्ञासूर्य तो तळपला
अनुयायांचा निळासागर तिथे उसळला
-बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर, निगडी, पुणे ४११०४४
मो. 9890567468
संविधान
जगण्याचा दिला अधिकार
घेतला गरीबांचा कैवार
समानता रुजवली फार
संविधानाने
न्याय बंधुता समता
दूर केली विषमता
धन्य झाली जनता
संविधानाने
बहुजनाचा आधार
शिक्षणाचा प्रसार
संपवला अंधार
संविधानाने
आदर्श जगाला
दाखविला बाबांनी
संजीवनी लाभली
संविधानाने
जाती व्हाव्या नष्ट
हेच असावे उद्दिष्ट
मानवता जगी श्रेष्ठ
संविधानाने
संतोष बोंगाळे
पिंपळखूंटे सोलापूर
मो.९९२३९००८४०
भीमाची लेखणी
भीमाची लेखणी बोलू लागली
समतेची मशाल ती पेटू लागली !!धृ!!
कायदे, शिक्षण, जीवनाचा मार्ग
तुझ्या विचारांचा बा इथेच स्वर्ग
संविधनावर देशगाडी चालू लागली
भीमाची लेखणी बोलू लागली !!१!!
तत्व तुझे महान, तूच कैवारीस्थान
भीम चमत्काराने होतोय सन्मान
जगभर अशी किर्ती गाजू लागली
भीमाची लेखणी बोलू लागली !!२!!
फुलेना गुरूस्थानी देऊनी आदर
साहेबांच्या विचारांची करून कदर
निळ्या रंगाची उधळण होऊ लागली
भीमाची लेखणी बोलू लागली !!३!!
तत्वज्ञानी,अभ्यासू व्यक्तीमत्व
तगडे होते ज्ञानावर प्रभुत्व
ओळख लोकांना पटू लागली
भीमाची लेखणी बोलू लागली !!४!!
रोहिदास बापू होले
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे...
मो. ..९०२८३४१५३६
गजल ....
अंगार स्वाभिमानी, ओकीत सूर्य आला,
जोहार जिंदगीला, ठोकीत सूर्य आला ....
देण्या प्रकाश आम्हां, तेवतच राहिला तू,
बांधील नियम सारे, मोडीत सूर्य आला....
ज्ञानास पारखा मी, आहे अजून बाबा,
होवून बाप- आई, पोशीत सूर्य आला ....
अंगार पेटवूनी, परतून तू जरा ये,
रे हाल बांधवांचे, मोजीत सूर्य आला ....
तू भीष्म कलियुगाचा, स्थिरप्रज्ञ राहिला रे,
अपमान मोठमोठे, सोशीत सूर्य आला....
निर्मला सोनी, अमरावती
माफ करा बाबासाहेब
माफ करा बाबासाहेब
एरवी तुमच्या फोटोवर चिमण्यांचा खोपा अन्
पुतळ्यांवर काकादिक पक्षांचा थवा..मात्र,
आज तुमच्यासमोर हारतु-यांच्या राशी !
कारण,
तुम्ही आम्हाला घनघोर आठवता,
निव्वळ जयंतिमयंतिच्या दिशी !!
लांबलचक लफ्फेदार भाषणांसाठी
बाबासाहेब !! खरच आम्हाला माफ करा
जीवनभर तुम्ही लढलात अक्षय चिकाटिने,
जातियतेविरुध्द.. पन आम्ही ?
आम्ही तुम्हाला एका जातिपुरतच नव्हे,
एकाधर्मापुरत रेटलं!
हेही नसे थोडके,
भगवा राम, हिरवा रहिम, भिमा आम्ही तुला निळ्या रंगात रंगवल !!
जाती,धर्म,भेदात आम्ही वाटलय तुम्हाला !
होवु शकेल तर खरच
माफ करा आम्हाला !!
तुमचे कार्य म्हणजे
काळ्या धरिञिच उर फाडुन
अंकुरलेला बिजाचा बोधिवृक्ष
त्या बोधिवृक्षाची छाया आम्हास लाभु द्या !
परतुन या तुम्ही
"जयभिम" गर्जना अवकाशी भिडु द्या !!
सुर्यासम तेज तुझे कर्तृत्व भिमा (२)
ग्रहणातल्या आम्हास खरच माफ करा
ग्रहणातल्या आम्हास खरच माफ करा !!
सौ.अंजली घंटेवार
संघर्षाचा नेता
दीनदलित, पददलितांसाठी
उदयास एक तारा आला
बाबासाहेब नांव तयाचे
जगामध्ये अमर तो झाला
विचारमग्न बालमन झाले
विषमता पाहून समाजातील
दूर करण्या ही खोल दरी
व्यक्त विचार मनातील
प्रगाढ अभ्यासक कीर्तीवंत
जगी ठरले थोर विचारवंत
संविधानाची कीर्ती दिगंत
झाले मसिहा ते यशवंत
बाबासाहेब एक संघर्ष
आदर्श ठेविला समाजापुढे
शिका, एकजुटीने संघर्ष करा
हाक दिली बांधवांपुढे
पाठपुरावा करु विचारांचा
सिद्ध करु महामानवाला
प्रणाम वीरा तव बुद्धीला
तेवत ठेवू तव ज्योतीला
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
दीनाचा ज्ञानसूर्य
वंचितांना न्याय दिला
दिला जगण्याचा मान
कार्य केलेस महामानवा
लिहले भारतीय संविधान
नव्हती देशात कुठे समानता
सामन्यांचे जगणे होते अवघड
अपार कष्ट घेऊन तयांसाठी
झालात दीनांचा आधारवड
स्वातंत्र्य, समता, बंधुत्वास
संविधानात दिले अग्रणी स्थान
अजोड त्या कार्याने भीमराया
उंचाविली दीनदलितांची मान
प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचे
केला कायदा संविधानात
खरे अश्रु पुसले सामन्यांचे
पडला प्रकाश त्यांच्या जीवनात
मुलभूत हक्क मिळवून दिले
लोकशाहीचा केला अंगीकार
ज्ञानसूर्य तुम्ही गोरगरिबांचे
संविधानाने घडला हा चमत्कार
मीना सानप ,बीड
9423715865
बा भिमा ......
बा भिमा तुझ्यामुळे या जगण्यास अर्थ अाला
धर्म मानवतेचा खरा तुझ्याच येण्याने कळला
रोखून त्या मनुवादी प्रस्तापित वादळाला
लाख संकटे झेलून खंबिरपणे उभे राहिला
वेचले अायुष्य सारे बहुजनांच्या उद्धाराला
वंचितांचे अश्रू पुसण्या देह सारा झिजवला
लेखणीला बळ देवून पिडीतांचे वाली झाला
जागे केलेत तुम्हीच व्यवस्थेच्या गुलामाला
रात्रीचा दिन करुनी प्रज्ञासूर्य तुम्ही जाहला
अनंत पिढ्याचा अंधार तुम्हीच दूर केला
माणसाला माणुसपण देण्या ज्ञानपती जाहला
समता बंधुता स्वतंत्र्य न्यायाने निर्मीले घटनेला
शिका संघटीत व्हा संघर्ष करा मूलमंत्र हा दिला
घरोघरी नवचैतन्य अन् स्फूर्तीचा झरा वाहिला
कर्तुत्वाच्या जोरावर गवसणी घालता येते यशाला
जाती धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ याचा बोध खरा कळला
शांतीचे दूत बनून तुम्ही धम्मास शरण गेला
सत्य अहिंसा परोपकाराचा संदेश तुम्ही दिला
व्यवस्थेवर मात करुणी अस्मितेचा लढा जिंकला
ज्ञानाचे प्रतिक तुम्ही विद्ध्वतेने जगी झळकला
मारुती खुडे, माहुर जि. नांदेड ९८२३९२२७०२
संविधान आणि जनता
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त थोडेसे. ....
आधुनिक भारताचे निर्माते, मानवी स्वातंत्र्याचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व नेते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 62 वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण भारतात पुण्यस्मरण म्हणून पाळला जातो.
ते नाहीत एका जातीचे
ते नाहीत एका धर्माचे
ते भारत राष्ट्राचे सुपुत्र आहेत
बाबासाहेब सर्व भारतीयांचे ...सर्व भारतीयांचे..!!
प्रिय भारत देशवासियांनो डाॅ.बाबासाहेब हे कुणा एका जातीचे, धर्माचे अथवा प्रांताचे नाहीत तर ते तुमचे आमचे सर्व भारतीयांचे आहेत. लहानपणापासून आपल्याला ते फक्त अस्पृश्यांचे अथवा बौध्दांचे नेते आहेत हे ठासून सांगितले जाते त्यांचे खरे योगदान झाकून ठेवले आहे. त्यांनी हिंदू धर्म सोडला हेच सांगून त्यांचे हिमालयाएवढे कार्य लपवून ठेवले होते. पण बाबासाहेब हेच तुमचे आमचे, भारयीयांचे कैवारी, क्रांतीसूर्य नेते, आणि जागतिक विद्वान, समाजतज्ञ इतिहासकारांच्या भाषेत सांगायचे तर आधुनिक भारताचे निर्माते आहेत. 'वाचाल तर वाचाल 'त्यांची ही म्हण शिक्षणक्षेत्रात अत्यंत मार्गदर्शक ठरते. आधुनिक युग हे संगणकीय आहे तरीसुद्धा पुस्तके वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. सध्याची शिक्षण प्रणाली ही अवांतर वाचनावरच भर दिलेला आहे. म्हणून सर्वच मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतरही वाचावेच लागेल. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." शिक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहचावा हाच त्यामागील शुद्ध हेतू होता. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होय. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हेच धोरण लक्षात घेऊन बाबासाहेबांनी उभ्या आयुष्यात ग्रंथाना गुरू मानलेत.
'एक ना धड भाराभर चिंध्या' याविषयीचे अत्यंत सुंदर उदाहरण विद्यार्थ्यांना देतात. कोणतेही एकच काम हातात घ्या. ते काम पुर्ण होईपर्यंत दुसरे काम हाती घेऊ नका. अन्यथा एकाच वेळी अनेक कामे हातात घेतल्यास कोणतेच काम पूर्णत्वाला जात नाही. सर्व अर्धवट व निरर्थक होते. विद्यार्थीदशेत असताना वेळ वाया जावू नये म्हणून त्यांनी वाचनालयात पावाच्या तुकड्यावर दिवस काढलेत. फावल्या वेळेचा सदुपयोग वाचनासाठी करून स्वतंत्र भारताला संविधान लिहून ठेवले. आज भारतीय जनता संविधानामुळे पुर्णपणे स्वतंत्र झाली आहे. संपूर्ण भारतात 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. शहरातील तरूण पिढीने संविधान सप्ताह साजरा केला. वर्तमानपत्रातून वाचण्यात आले की, या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींनी अशा कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कारण तरुण पिढीतील या युवकांचे अशा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जितके कौतुक करावेत तितके कमीच आहे. परंतू ज्या महामानवाने आपले संपूर्ण आयुष्य दलितांसाठी झिजवले, देशाला स्वातंत्र्यांचे हक्क मिळवून दिले होते, त्याच देशातील जनता संविधान सारख्या कार्यक्रमात रस घेत नाही. हे सर्व वाचून वाईट वाटते. लोकशाही पध्दतीने निवडणूक होते, परंतु निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी हा कधीच क्षेत्रसभा घेत नाही. आपल्या प्रभागातील अडचणीविषयी कधीच सामान्य जनतेशी चर्चा करत नाही. या सर्व हक्क व कायद्यांविषयीचे ज्ञान जनतेला संविधानातील तरतुदी माहिती असणे ही काळाची गरज बनली आहे. शहरातील अथवा गावातील नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही असो निवडणूक जेव्हा येतात तेव्हाच त्यांनी मतदानासाठी बाहेर पडताना दिसतात. नंतर मात्र पाच वर्षांत समस्या, अडचणी विचारण्यासाठी कधीच आपल्याला कोणत्याही प्रभागात दिसून येत नाही. आजही जनता सुशिक्षित असूनही अशिक्षितपणासारखी वागत आहे. जिकडेतिकडे भ्रष्टाचार वाढला आहे. प्रामाणिकपणाचा बोलबाला आहे. माणूस पैशासमोर विकला जातोय. आज बाबासाहेबांच्या अधिकारांचा व हक्कांची पायमल्ली होताना सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या घडीला जनतेने जागरूक राहून अन्यायाविरुद्ध पाऊल उचलणे गरजेचे आहे. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांसाठी हीच खरी आदरांजली ठरेल.
सौ. सारिका राजेश सब्बनवार
कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड
मो.9518314224.
स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर
समाजात प्रस्थापित समाजव्यवस्थेचे सर्वत्र अंधुक धुके पसरले असतांना, सामाजिक असमानतेचे धुके दूर करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला, ते म्हणजे थोर भारतीय विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय समाज क्रांतीचे मुकुटमणी, दलितोद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क, अधिकारच नाही तर त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचा महत्वपूर्ण विडा उचलला .समाजातील उपेक्षित घटकांना त्यांना न्यायचं मिळवून दिले नाही तर त्यांच्यात आत्मविश्वासाची महत्वपूर्ण फुंकर त्यांनी घातली . स्त्री मुक्तीचे ते पक्के समर्थक होते. समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर अवलंबून आहे .त्यामुळे त्यांनाही प्रत्येक अधिकार मिळायला हवा ,यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले .समाजातील शोषित स्त्रियांना काळोखाच्या अंधारातून प्रकाशाच्या उजेडात आणणारे ते क्रांतिसूर्य होते .ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्मम स्थान होते. स्त्रियांना प्रत्येक अधिकारापासून ,हक्कापासून वंचीत ठेवल्या जात होते ,ज्या स्त्रीला ती जन्मताच कपटी, धूर्त, लबाड अश्या कितीतरी पालुपदाने नेहमीच अपमानित केल्या जाई ,ज्या समाजाला ती अध्यात्म मार्गातील धोंड ,अविवेकी, चरित्रहीन वाटली तिला मानाचे स्थान हक्क मिळून देणारे ते न्यायदाते ठरले .
समाजात चूल आणि मूल एवढंच तीचं विश्व् असतांना स्त्री उद्धारक महात्मा जोतिबा फ़ुलेंनी व सावित्रीबाईंनी तिला तिच्या अस्तित्वाची खरी ओळख करून दिली. समाजाच्या विरोधाला न जुमानता तिला तिच्या यशाचे मार्ग खुले करून दिले. त्यांच्यानंतर त्यांच्या कार्याची व विचारांची धुरा सांभाळण्याची महत्वपूर्ण जवाबदारी बाबासाहेबांनी पार पाडली . समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर आधारलेली असून कोणतीही एक बाजू कमकुवत असल्यास समाजाची प्रगती ढासळते असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे समाजात स्त्रियांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ते स्त्रीशिक्षणाचे कट्टर पुरकर्ते होते. भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता, स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांच्यावर बळजबरीने लादलेले विवाह, कमी वयात लादलेले मातृत्व ,हे सर्व समाजव्यस्थेचे रूप बघून त्यांचे मन अस्वस्थ होतं. अश्या या सर्व जोखडी समाजव्यवस्थेतून स्त्रियांना मुक्त व्ह्ययचे असेल तर तिने शिक्षित व्हायला हवे ; तोच त्यांच्या उन्नतीचा खरां मार्ग होय. असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यान व लेखणीतून दिला. स्वतंत्र भारताचे पहिले मजूरमंत्री असतांना स्त्रियांच्या बाजूनी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये कामगार स्त्रीला प्रसूती रजा, काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांबरोबरची मजुरी, बहुपत्नी विवाहाला पायबंदी तसेच स्त्रियांना 21दिवसाच्या किरकोळ रजा, प्रसूती रजा मिळवून देण्याची तरतूद त्यांनी करून दिली. स्त्रियांना प्रसूती रजा मिळवून देणारे जगातील ते पहिले व्यक्ती होते. त्यानंतर अनेक देशांनी महिला प्रसूती रजा आपल्याही देशात लागू केल्या. स्त्रियांच्या अंत्यत संवेदनशील काळातील ही प्रसूती रजा तिच्यासाठी जणू पर्वणीच ठरली आहे. स्त्रियांवरील हे उपकार कोणतीही भारतीय स्त्री विसरू शकणार नाही . त्यामुळे तिला मातृत्वाचा पुरेपूर आंनद घेता आला यासाठी ती सदैव त्यांची ऋणी राहील.
स्त्रियांच्या समान हक्क कायद्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यापैकी एक म्हणजे 1947 मध्ये कायदेमंत्री असतांना त्यांनी हिंदू कोड बिलाचा महत्वपूर्ण प्रस्ताव लोकसभेत मांडला ज्यामध्ये स्त्रियांच्या न्याय हक्कासंबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. स्त्रियांना मुलं दत्तक घेता येत नव्हते, तिला वारसाहक्कापासून वंचीत ठेवल्या जात होते , तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार नसल्यामुळे ती असाह्य जीवन जगत होती. अशी स्त्रियांची दयनीय अवस्था असतांना त्यांना पाठबळ देणारे हिंदू कोड बिल त्यांनी लोकसभेत मांडले , त्यामध्ये अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबधातील स्त्रीपुरुष समानता, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार, वारसाहक्क, मतदानाचा हक्क, दत्तक घेण्याचा अधिकार यासारखे अनेक स्त्री उद्धारक तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण तिथेही हिंदू कोड बिल पास करण्यास विरोध झाल्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावरून हे लक्षात येते की ते स्त्रीहक्काचे किती पुरस्कर्ते होते .
बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक चळवळीत स्त्रियांना पुरुषांबरोबरीने सहभागी केलं होते. मग तो 1927 चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असो , अथवा 1930 चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असो किंवा 1942 ची नागपुरातील महिला परिषद असो या सर्वच चळवळीमध्ये त्यांनी महिलांना हिरहिरीने सहभागी करून घेतले होते .यावरून हे लक्षात येते की महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने समाजमध्ये प्रत्येक चळवळीमध्ये त्यांनी सहभागी करून घेतले होते .ज्या समाजव्यवस्थेमध्ये बालविवाह अस्तित्वात होती ,देशातील लग्नपद्धिती अत्यंत घातक होती,जठरविवाह पद्धतीमुळे बळजबरीने कमी वयाच्या मुलीशी तिच्यापेक्षा तीनपटीने मोठया असलेल्या पुरुषाशी लग्न करून दिल्या जात होते. अशा समाजव्यवस्थेत तिच्यात आत्मशक्तीची फुंकर घालण्याचे काम बाबासाहेबांनी केले . स्त्रियांचे मनोधैर्य वाढविले ,स्त्रीचे कमी वयात लग्न करणे म्हणजे तिच्या प्रगतीत खूप मोठी अडचण निर्माण करणे होय. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या हक्क अधिकारासाठी स्वतः पुढे यायला हवे असे परखड मत त्यांनी समाजासमोर मांडले. यामागे फक्त दलित स्त्रियांचा उद्धार करणे एवढाच उद्देश नसून संपूर्ण स्त्री जातीला उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा, त्यांच्यात बौद्धिक, आर्थिक, मानसिक विकासाची रुजवणूक करून , तिला न्याय अधिकाराचे पाठबळ मिळवून देणे हा होता. स्त्री सक्षमीकरणाचे मार्ग त्यांनी दाखविले. आज स्त्रिया त्यांच्या या कार्यामुळे अनेक क्षेत्रात झेप घेत आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क प्राप्त देणाऱ्या या महामानवाच्या मौलिक कार्याला पुन्हा एकदा उजाळा देत डॉ. बाबासाहेबांच्या या कार्याला शतशः अभिवादन व कोटी कोटी प्रणाम !
प्रा. वैशाली रितेश देशमुख
(कनिष्ठ व्याख्याता )
ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कुही ,
ता .कुही ,जि .नागपुर
7420850376
// प्रणाम। //
धन्य धन्य ते रावजी , भिमाई
जयांनी दिधला जन्म भिमाला ,
नतमस्तक त्यांचे चरणी
अर्पिते ही शब्दफुलांची माला //१//
मानिलेस आपुले भिमाने अस्पृश्य दलितांना,
दिलेस मिळवून हक्क श्रमिक नी मजुरांना//२//
प्राथमिक शिक्षणाचे समजाविलेस महत्व,
स्त्री शिक्षणाने जागविलेस तियेचे अस्तित्व//३//.
हक्कासाठी द्यावा लढा संघटित होऊन,
चळवळीचे सामर्थ्य प्रत्यक्ष दाविले जगुन//४//.
प्रज्ञा शिल करुणेचे मुल्य तयाने जगा दिधले,
समता न्याय अन् बंधुभावाचे बीज पेरले //५//
दाटला होता काळोख अवघ्या समाजात,
चेतविले स्फुलिंग , मुर्दाडात तेविली प्राणज्योत//६//.
त्याच्या पदस्पर्शाने पावन झाली ही धरा,
कोटी कोटी प्रणाम आमुचे तुजला
महामानवा //७//
सौ.आरती महेश डिंगोरे
नाशिक
दूर आलो
आजार 'मी'पणाचा सारून दूर आलो
ही कात आज माझी टाकून दूर आलो
अंधार दूर झाला एेकून दिव्य वाणी
अज्ञान जीवनाचे जाळून दूर आलो.
दंभात गुंग झाली आहेत सर्व नाती
खोट्याच माणसांना टाळून दूर आलो
मदमस्त फक्त जगलो मस्तीत रोज माझ्या
मी मर्म जीवनाचे विसरून दूर आलो.
त्यागून दुर्गुणांना लढण्यास सिद्ध झालो
जयराम मी निराशा सोडून दूर आलो
जयराम मोरे सोनगीर, धुळे
" शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा "
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ. सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. याच प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. त्यानंतर त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे. लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.
देशांतील अतिगरीब आणि अति मागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असॆ त्यांनी लोकाना सांगितले होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतः सोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते.
प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवासमान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. सलग 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. त्यांचे घर पुस्तकाने भरून गेले होते. त्यांनी अनेक पुस्तकांची अभ्यास केले आणि बरीच पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचाअभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या , शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त दलित लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेला आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अश्या महामानवाची दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले, त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
महामानव बाबांस..
जगण्याचे मंत्र
शिकविले बाबांनी
अन्यायाचा प्रतिकार
करण्याचे शिकविले बाबांनी
स्वातंत्र्य,समता,बंधुता
शिकविली बाबांनी
शिकण्याचा,शिकविण्याचा अधिकार दिला बाबांनी
जातपात,राव-रंक भेद
नष्ट केला बाबांनी
भारतीय संविधानातून
मानवतेची शिकवण
दिली बाबांनी
भारताच्या ज्ञानसूर्याने
जगाला शांतीची शिकवण दिली बाबांनी.
बाबा जन्मले नसते तर
आजही सर्वसामान्य
राहिला असता गुलाम
अशा ज्ञानरुपी
महामानव बाबांस
माझा त्रिवार सलाम....!!
व्यंकटेश काटकर, नांदेड
९४२१८३९५९०.
Comments
Post a Comment