08 मार्च जागतिक महिला दिन विशेष लेख

महिलादिन आणि स्त्री सक्षमीकरण....!!

खांद्यावर घेऊन आकाश अर्धे
चला जाऊया पुढे,
नव शतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे धडे

असे म्हणत 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने जगभऱ्यात साजरा करण्यात येतो. महिलांनी महिलांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी दिलेल्या  लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस विशेष महत्वाचा आहे. जागतिक पातळीवर महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जगभऱ्यातील रणरागिणीला आजच्या दिवशी मानाचा मुजरा...
ज्या समाजव्यवस्थेत स्त्रियांना उपभोगाचे व कष्ट करण्याचे साधन समजल्या जायचे त्या समाजातील महिलांना मतदानाचा हक्क, संपत्ती हक्क, समानतेचे हक्क, शिक्षणाचे हक्क मिळून देण्यासाठी जागतिक पातळीवर लढा दिला, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची सजगता दाखवून स्त्रियांच्या आत्मभानाला जागृत केले, त्या स्त्रियांच्या नेतृत्वाला नतमस्तक होण्याचा हा दिवस ! त्यांच्याच या लढ्यामुळे आज स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून पुढे जात आहेत. नवनवीन क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे. अवघड क्षेत्रातही तिने आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने यशाचे कर्तृत्व गाजविलेले आहे, प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले आहे. असे  सकारात्मक चित्र सर्वत्र असतांना  दुसरीकडे मात्र वर्तमानपत्रात स्त्री अत्याचाराच्या मनाला सुन्न करून टाकणाऱ्या घटना रोजच वाचायला मिळतात. स्त्री अत्याचाराच्या मानव जातीला कलंकित करणाऱ्या घटना जेव्हा आपण वाचतो, आजूबाजूला बघतो तेव्हा वाटते, खरंच स्त्री आजही सक्षम ,आत्मनिर्भर झाली आहे का ?तिच्याकडे आजही समानतेच्या दृष्टीने समाज बघतो आहे का ? तिला खऱ्या अर्थाने विचार करण्याचं स्वातंत्र मिळालं आहे का ?अ से अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात आणि एकच भीषण सत्य डोळ्यासमोर येते ते म्हणजे आजही स्त्रियांना समाजात दुय्यम स्थानच आहे .स्त्रियांचा होणारा कोंडमारा, सतत भीतीच्या दहशतीत जगणं, अन्याय, अत्याचार मूकपणे सहन करणं, रडणं, कुढणं हेच तिच्या वाट्याला आलेलं भोगदान ! हेच त्रिकालबाधित सत्य ! त्यामुळे स्त्री सक्षमीकरणाचे व स्त्री समानतेचे सर्वच नारे फोलचं ठरतात .
       म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने या विषयावर खऱ्या अर्थाने चिंतन होणे गरजेचे  आहे. आज समाजातील प्रत्येक विदारक चित्रात जवळच्याच माणसांनी तिचा घात केलेला दिसून येतो. मग ते हुंडाबळीचे प्रकरण असो स्त्री भ्रूण हत्येचे किंवा स्त्री अत्याचाराचे इथे आपलेच शत्रू आणि आपलेच वैरी, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही असं असतांना प्रत्येक स्त्रियांनी स्वतःला सक्षम करणे गरजेचं आहे, स्वतःच्या आत्मस्वरक्षणार्थ कणखर बनणं महत्वाचं आहे. यासाठी तिने सजग असायला हवं. महिला नोकरी करते, ती स्वतः कमविते किंवा तिला पूर्णपणे आर्थिक स्वातंत्र असणे, म्हणजे ती सक्षम आहे असं म्हणता येणारं नाही. तर खऱ्या अर्थाने  ती  मानसिक, शारीरिक, भावनिक, वैचारिक दृष्ट्या सामर्थ्यशाली बनणे म्हणजे सक्षम असणे होय. स्त्रियांना समान हक्क, समान अधिकार, निर्णय घ्यायला पूर्णपणे स्वातंत्र, घरातील प्रत्येक निर्णयामध्ये तिला मिळालेलं बरोबरीचं स्थान ह्या गोष्टी जर तिला पूर्णपणे मिळालेल्या असेल तर ती पूर्णपणे सक्षम झाली असं म्हणता येईल. पण असं चित्र आपल्या देशात दिसून येतं नाही. स्त्री ही जन्मजात, अबला नाजूक, अनिर्णयक्षम, अविवेकी तिने एक स्त्री म्हणून आपल्या मर्यादेत रहायला हवं, तिने फक्त आपल्या निर्णयाच्या बाजूला झुकायला हवं असंच पुरुषप्रधान संस्कृतीचे चित्र, जे आजही वास्तव आहे. तिच्या निर्णयक्षमतेच कोणालाही देणंघेणं नसतं कारण एकच, ती एक स्त्री आहे म्हणून. हे विचार आज समाजातून पूर्णपणे नष्ट होणे गरजेचं आहे. याकरिता खऱ्या अर्थाने प्रत्येक महिलांनी लढा उभारायला हवा ....!!
     स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सशक्तीकरण जर पूर्णपणे आपल्या देशात घडून आणायचं असेल तर स्त्रियांनी पूर्णपणे शिक्षित होणं गरजेचं आहे. त्यासाठी अर्धवट शिक्षण न सोडता तिने पूर्णपणे शिक्षण घ्यायला हवं. कारण शिक्षणातूनच हक्काची, अधिकाराची आणि महिलाविषयक कायद्याची माहिती मिळत असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या विचाराचे स्वातंत्र. एक स्त्री जेव्हा आपल्या पोटातील गर्भ तपासायला तयार होते तेव्हाचं तिचा गर्भपात होत असतो. स्त्री भ्रूण हत्येची स्वत:ही ती अपराधी असते. तेव्हा घरच्यांच्या निर्णयाला झुंगारून तिने अशा वेळी खंबीर राहायला हवं. तेव्हाच स्त्री भ्रूण हत्येचे पाप समाजात होणार नाही. स्त्री सक्षमीकरणाकरिता 1991 पासून आपल्या देशात धोरण राबविल्या जातं आहे. 2001मध्ये त्यात आमूलाग्र बदल केल्या गेले. त्यात महिलांना कृषिक्षेत्रात सबसिडीज, बारावीपर्यंत मोफत शिक्षण, मोफत प्रवास, आरोग्य विषयक योजना, सबला योजनेत वयाच्या 11 ते 18 वर्षापर्यतच्या किशोरवयीन मुलींसाठी विशेष योजना, मुलींसाठी हॉस्टेल योजना, प्रियदर्शनी योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना, या सर्व योजनाचे योग्य तो उपयोग करून आजच्या प्रत्येक स्त्रियांनी सक्षम व्हायला हवं.
       आजच्या काळात प्रत्येक स्त्रीने सक्षम होणं गरजेचं आहे. त्याकरिता पुरुष वर्गानेही स्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा .आपल्या बरोबरीने तिच्या विचाराचा सन्मान करायला हवा, तिच्याकडे आदराने बघायला हवे. समाजव्यवस्थेत स्त्रियांचा आणि पुरुषांचा बरोबरीचा वाटा असल्यामुळे दोन्ही घटकांचा सर्वांगिण विकास होणं गरजेचं आहे. त्यावरच या देशातील समृद्धी आणि विकास अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी शिक्षणाची कास धरणे, हक्कासाठी लढणे आणि जिथे जिथे अन्याय होतोय तिथे आवाज उठवणे गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक महिलांनी महिलांना सहकार्य करायला हवे. सरते शेवटी एकच सांगावं वाटते

दरिया की कसम मौजो की कसम
ये ताना बाणा बदलेंगा
तू खुद को बदल, तू खुद को बदल
तब ही तो जमाना बदलेंगा

प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा .कुही जि. नागपूर
7420850376
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

समानता : एक आश्वासक

राजेराजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांना महिलादिनानिमित्य कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. म म्हणजे महत्वाकांक्षी. हि म्हणजे हितवादी आणि ला म्हणजे लाजवंती. अशा तमाम महिलांना आजच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! !

'अरे संसार संसार,
जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके,
तेव्हा मिळते भाकर.'

पुरातन काळापासून चालत आलेल्या स्त्री-पुरूष समानतेच्या मुद्यावर अनेक भाषणे, चर्चासत्रे, कायदे निघालेत अन् रंगलेतही पण अजूनही परिस्थिती जैसे थी असलेली दिसून येते. मात्र आज ही परिस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे. कारण कित्येक कुशल नेतृत्वाच्या महिला चूल आणि मूल यातच अडकून ठेवलेल्या आहेत. आज देशाला योग्य निर्णयक्षमतेची, कुशल नेतृत्वाची गरज आहे. वेळ आली आहे समानता हे मूल्य कृतीत उतरवण्याची. आज स्त्री ही पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहे हे अत्यंत गौरवास्पद आहे. परंतु अजूनही काही शहरात स्त्रीला 33 टक्के आरक्षण देवून ही राजकीय क्षेत्रात केवळ कागदोपत्रीच, बॅनरवरच  नगराध्यक्षा, नगरसेविका व सरपंच पदावर आहे. निर्णय व आर्थिक कारभार अजूनही तिचा पतीच चालवतो. हे कुठे थांबवायचे असल्यास प्रत्येक पुरूषाच्या मनात समानतेचे बीज पेरणे गरजेचे आहे. त्यांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे. आज शिक्षणक्षेत्रात मुलींनी गगनभरारी घेतलेली आहे. पण लग्न करण्यासाठी योग्य जोडीदार मिळत नाही. काही समाजात अजूनही मुलींना आपल्यापेक्षा कमी शिक्षण झालेल्या मुलांसोबत त्या समाजातील रूढीपरंपरांचा स्वीकार करून आपल्या इच्छा, आकांक्षांना तिलांजली द्यावी लागते.
आज देशातील प्रत्येक महिलेला ज्या वीरपत्नी, वीरमाता, यांचा अभिमान बाळगावा. उदा.महाराष्ट्राची कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा 'भावूक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना' असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. त्याचबरोबर सबइन्सपेक्टर रेखा मिश्रा. 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केले. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला व स्त्रीजातीला त्यांचा अभिमान वाटतो.
जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'अरूणिमा'! अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरूणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. 'एव्हरेस्ट गाठणे हे भल्याभल्याचे स्वप्न असते; पण सकारात्मक दृष्टीने अरूणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. आज वेळ आलेली आहे प्रत्येक महिलेला आपल्यातील जिद्दी अरूणिमा शोधण्याची. आपल्या मुलांवर शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी जसे तयार करतो त्याबरोबरच माता जिजाऊंच्या संस्कारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुशल शासक बनवण्यासाठी प्रत्येक महिलेला छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी युवा घडवणे गरजेचे आहे. यासाठी हवाय या पृथ्वीतलावर ईश्वराने ज्या दोन बुध्दीमान जीवांची निर्मिती केली आहे त्या जातीतील स्त्री पुढे जाण्यासाठी पुरूषाने आपली मानसिकता बदलून व अहंमपणा बाजूला सारून तिच्यातील खऱ्या उमेदीला,कर्तृत्वाला प्रकाशमय करून योग्य दिशा देणे गरजेचे आहे. बऱ्याच महिलांना नौकरी करताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हातातील कामे सुटत नाही. पती-पत्नी दोघेही मिळून प्रत्येक कामाची समान विभागणी केल्यास तिला स्वतःसाठी वेळ काढता येईल. लग्नापूर्वी वाचन-लेखनाची आवड असलेल्या मुलीचे जीवन चूल आणि मूल याभोवतीच गुरफटलेलले दिसून येते. तिच्यातील साहित्यिकाचा , प्रतिभेचा अंत झालेला दिसतोय. दररोजचे वर्तमानपत्र ही वाचणे तिला होत नाही. रात्री वाचण्यास हातात पुस्तक घ्यावे म्हटले तर शारीरिक, मानसिक थकव्यामुळे कधी झोप लागते हेच तिला कळत नाही. सध्या साहित्यिक क्षेत्रात पुरूषांच्या तुलनेत  अगदी बोटांवर मोजण्याइतकेच स्त्रिया लेखन क्षेत्रात दिसतात. कारण बर्‍याच महिलांना लेखन करण्याची इच्छा असूनही कंबरेच्या व मानेच्या आजारामुळे लेखन करू शकत नाहीत. महिलांमधील स्त्रीसामर्थ्याचा विकास होण्यासाठी 'स्त्री-पुरूष समानता'हे केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील स्त्री-पुरूष समानता या मूल्याला खरा अर्थ प्राप्त होईल.
म्हणुनच कवी जगदीश खेबुडकर आपल्या कवितेत म्हणतात की, 'आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा! !
पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्व-सामर्थ्याची ओळख करून देताना आपल्या क्षमतांवर सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परावलंबित्वाचे कवच फोडून स्व-सामर्थ्याची उंच शिखरे पादाक्रांत करा. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या. असा संदेश आज प्रत्येक महिलेला या जागतिक महिला दिनानिमित्त देवू इच्छिते.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श आजच्या सर्वच पुरूषांनी घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरूषामागे महिलेचा हात असतो त्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी महिलेमागे पुरूषाचा हात असतो. म्हणून
आजच्या काळात स्त्री-पुरूष या जातीच्या वांद्यात न पडता आपल्यातील कौशल्य ओळखून त्या दिशेने वाटचाल सुरू केल्यास कुठेच स्त्री-पुरूष भेदभावाचा धागा शिल्लक राहणार नाही. म्हणूनच कवयित्री  नीरजा यांनी आपल्या कवितेत म्हणतात की,

'माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र
उद्याच्या जगाचं जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.'
'भातुकलीच्या प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं..!!

सौ.सारिका राजेशजी सब्बनवार  (मद्दलवार )
कै.गं.पो.स.प्रा.शा.कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड
9518314224
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

महिला सक्षमीकरण

"   यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते तत्र  देवता "  असे प्राचीन काळापासून स्त्री संदर्भात म्हटले जाते. ते खरेही होते.  मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे स्त्री ही एक देवताच आहे असे समजले जायचे. तिला मान होता. अनेक शोध तिच्या नावावर आहेत. ती विद्याविभूषित होती. अनेक सभांमध्ये त्यांनी विद्वानांना वादविवाद स्पर्धेमध्ये हरवले आहे. याचाच अर्थ असा होतो की स्त्री कालची असू दे नाहीतर आजची असुदे ती जागृत व महानच आहे. मध्ययुगीन काळात ती बंधनात अडकत गेली ,व पूर्णपणे दुर्लक्षित झाली. पण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नातून महिला त्यांच्या दास्यत्वातून बाहेर आल्या. शिकू लागल्या, विचार करू लागल्या.
पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीचे व्यक्तित्व व स्वातंत्र्य ती हरवून बसली होती. तिला देवी माता बनवून पूजनीय  केले होते व घर रुपी मंदिरातच तिने तोंड बंद करून रहावे अशी अपेक्षा बळावत गेली. स्त्री सुद्धा देवीच्या रूपात, दागदागिन्यात, साज शृंगारात अडकून गेली. तिच्यामध्ये पुन्हा नवचैतन्य, स्वत्वाची, स्वातंत्र्याची भावना परत आणण्यासाठी व अत्याचाराचा सामना करण्याची धमक व बळ तिच्यामध्ये निर्माण करण्यासाठी यासाठी महिला सबलीकरणाचे प्रयत्न चालू झाले. महिलांना स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळू लागले, प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. शैक्षणिक सवलती देण्यात येऊ लागल्या, औद्योगिक शिक्षणाची सोय निर्माण झाली. गरज आहे ती फक्त स्त्री- जागृतीची.
आजची स्त्री सफल, जागृत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज आपण पाहतो ती सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे.  अनेक स्त्रिया घरच्या कामाबरोबरच बाहेरील कामे लीलया पार पाडत आहेत त्यामुळे ती आता सर्वांगीण विकास कसा साधायचा हे दाखवून देत आहे. घरपण सांभाळता सांभाळता राजकारण व समाजकारण ही क्षेत्रे तिला आता नवीन नाहीत ती हे सर्व सहज करू शकते व बऱ्याच ठिकाणी महत्त्वाचे निर्णय आता तिला विचारून घेतले जातात. शहरातील किंवा खेड्यातील महिला असु द्या आज आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक आहेत. त्यांच्या भवितव्याचा विचार त्या करू शकतात. विधवा असोत वा  परित्यक्त्या स्त्रिया या एकट्याने राहून समर्थपणे कुटुंबाला सांभाळतात. हे सर्व शिक्षणामुळे झाले आहे हेही तिला उमगले आहे. कर्ता पुरुष जर हवालदिल, दुःखी निराश झाला तर आपले दुःख बाजूला सारून ती त्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करते व परत त्याला उभे करते. हे एक जागृत स्त्रीच करू शकते. पण तरीही बऱ्याच ठिकाणी आदिवासी अशिक्षित स्त्रिया या बदलापासून खूप दूर आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे तरच आजच्या सुशिक्षित व सक्षम असणाऱ्या स्त्री वर्गाला बळ मिळेल व तिला पुढे जाता येईल. तरीही आजच्या स्त्रीने मारलेली गगनभरारी काही कमी नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खचून न जाता सर्व निराशाजनक परिस्थितींना बाजूला सारून येणाऱ्या दुःखांना हसत खेळत सामोरे जाण्यासाठी  एकविसाव्या शतकातील महिलांना सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांनी स्वतःला  सौंदर्याच्या निकषातच  न बसवता कर्तृत्वाच्या  निकषातपण बसवले पाहिजे. स्वतःचे सौंदर्य वाढवून स्वतःला " बार्बी डॉल्स " बनवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने व हिंमतीने " आयर्न लेडी " बनले पाहिजे. हीच आजच्या युगाची मागणी आहे. स्त्रीचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमांना उत्तेजन दिले पाहिजे. एकविसाव्या शतकात सुद्धा वासनापूर्तीचे व वंशसातत्याचे एक साधन जरी मानले जात असले तरी स्त्रीने जागरूकता दाखवली ,आपले कर्तृत्व सिद्ध केले व समाजाने तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तीसुद्धा एक मानव व भावना असलेली एक व्यक्ती आहे असा विचार केला जाईल.
  महिला सबलीकरणाला फार मोठा सामाजिक, मानसिक आशय आहे. यामुळे तळागाळातील स्त्रियांच्या पासून प्रत्येक स्त्री ही स्वावलंबी जीवन जगू शकेल. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. कारण भारत रुपी रथाची ही दोन्ही चाके सक्षम व सबल असले पाहिजेत.

"   होईल महिला सबला, सबलीकरणाने,
     अपेक्षा करेल पूर्ण आपल्या आचरणाने.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
9881862530
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

महिला दिन साजरा करताना ......!

पुस्तक वाचत असताना मागे वळून  पाहताना विचारात मग्न झाले अरे पूर्वी अस का म्हणत होते  ,"मुलगी  परक्या घरच धन, ज्या दिवशी लग्न झाले त्याच दिवशी आम्हाला मेलीस, हुंडा अनेक अनिष्ट प्रकार का रुढ झाले ..याच कारण आपणास सत्यापासून दूर ठेवले आहे. स्त्री ची अस्तित्व फक्त पुरुषासाठी अस काही हिंदू संस्कृती सांगते आहे आणि तेच आपण पुढे वाहत नेतो आहोत. विचार करीत नाही या संस्कृतीने आम्हाला काय दिले ?.आज ही  स्वतः ला शिकलेली म्हणणारी स्त्री पती हाच परमेश्वर का मानते ..हिंदू संस्कृती आणि स्त्री या पुस्तकामुळे उत्तर मिळाले ..
लग्नाआगोदर  वडिल रक्षण करतात नंतर पती आणि त्यानंतर पुत्र रक्षण करतो.  येथे अर्थ खूप वेगळा आहे बर ! रक्षण म्हणजे काळजी घेणे, संकटातून दुबळ्या असलेल्या स्त्रीची काळजी घेणे असं धर्मशास्त्र सांगते पण मुळात या शब्दाची चिकित्सा केल्यास याचा अर्थ नजर ठेवणे, अधिकार गाजविणे, सत्ता चालविणे असा अर्थ आपटे कोशात दिसून येतो ..रक्षण अर्थ काळजी घेणे वगैरे नाही तर सत्ता चालवणे असा होतो 
दुबळ्याचे रक्षण करण्याचे निमित्त करुन आपला गुलाम बनवायचे  हीच बलवंताची रीत आहे ..
रक्षण याचा अर्थ आत्मरक्षणाचे सामर्थ्य निर्माण करणे, रक्षणासाठी तो आपल्यावर अवलंबून राहता कामा नये असा असायला हवा, पण  हे होताना दिसत नाही. कितीही महिला शिकली तिचं अस्तित्व पुरुषाशिवाय नाही हेच रुजवलं जातं, ती स्वतंत्र कुठे आहे मग ?
    महिलांच रक्षण करण्याच्या नावाखाली स्वयंपाक भांडी वगैरे कामात गुंतवावे, हीच परंपरा, मेंदूचा विकास होऊच द्यायचा नव्हता आमचा, हे मात्र सत्य ....!
महिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात कधी वावरेल ? किती प्रमाणात महिला स्वतंत्र आहे ?
आज कामात कार्यालयात सुर निघतो 33 टक्के आरक्षण मिळाले की करा बरोबरीने काम ! खरंच शिक्षण पद्धतीने आपणाला घोकू आणि ओकू केलं आहे  ..
    बदल हा वर्तनातून व्हायला हवा.
शतश: प्रणाम या महामानवास  ज्यांनी शिक्षणाची बीजे पेरली  आरक्षण मुहूर्त मेढ रोवणारे छत्रपती शाहु महाराज  क्रांतीसूर्य महात्मा फुले विश्वरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर , ज्यांनी आम्हाला संविधानातून स्वतंत्र दिले आणि स्वतंत्र याचा अर्थबोध दिला ...

अनिता  जावळे / वाघमारे
मु.पो.मुरुड सावतामाळीनगर
ता.जि.लातूर
9545050292
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच

       प्रा डॉ. रत्ना दशरथ नगरे

‘तिच्या’ वाटय़ाला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. हे शत्रू किती आहेत याची गिणती करणे सोपे आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणे अवघड आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळला नख लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही ‘जन्मदात’ आईबापाच्या संमतीने आणि आजी-आजोबा, आत्या, मामा यांच्या साक्षीने. कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर (की हत्या?) मातृप्रेमाच, वात्सल्याच्याही चिंधडय़ा उडवल्या जाताना तिला पाहावे लागते. 
या जगात प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती असते. घरातल्या जवळच्या नातेवाईकापासून गावच्या गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो. प्राणीजीवन टिपणार्‍या टी.व्ही. वाहिनीवरील खूँखार श्वापदेही असे प्रसंग पाहून माना खाली घालतील. तिच्या आयष्यातल्या स्वप्नसोहळा म्हणजे लग्न असेल तर त्यानंतरही तिला ‘तिच्या’ आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यांची लालसा स्टोव्हच्या इंधनापेक्षा जास्त ज्वालाग्राही बनते व असे अनेक स्टोव्ह भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे मानवजातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे!
तिचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पुरूषी मानसिकता. साबण, चारचाकी किंवा कोणतेही उत्पादन विकण्यासाठी जाहिरातीतले तिचे प्रदर्शन असो, मोबाईलवरून मोबाईलकडे फिरणार्‍या ओंगळवाण्या, गलिच्छ चित्रफिती असोत, त्यातून तो पुरूषी अहंगंडच दिसून येतो. तो भाषेमध्येही कसा उतरला आहे, याचे उदाहरण नुकतेच ऐकावास मिळाले. गोटय़ांच्या खेळात जी गोटी हरते व मार खाते तिला कन्नड भाषेत ‘हेण्णु’ (मुलगी) व जिंकलेला आणि मारणार्‍या गोटीला ‘गंडु’ (मुलगा) म्हणतात.
अशा अनेक शत्रूंना रिचवत, पचवत ‘ती’ तिची लढाई लढत आहे. ती समाजाच्या नीतीमत्तेचा कणा आहे. बेहिशोबी संपत्ती गोळा करणार्‍या नवर्‍याचा हात तिने थांबवला वा मुलींशी बेताल वर्तन करणार्‍या आपल्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली तर चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. निसर्गाने तिला ‘प्रेम’ नावाची विलक्षण देणगी दिली आहे. ते तिचे शस्त्र आहे. या शस्त्राने ती अनेक अवघड शल्यकर्मे सहजरित्या पार पाडते. तिच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवूही शकते व विझवूही शकते. त्या मंत्राचा ती कसा उपयोग करते, यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे.
तिच्या डोळ्यातल्या अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील. ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री-पुरूषन्नामभेदे। शिवपण एकले नांदे।’ म्हणजे शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्त्व एकच आहे. स्त्री-पुरूष समानता याच्यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रूजायला आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही.
तिच ‘अर्ध्या आभाळा’तला श्रद्धेचा, विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच या जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा!!
९५६१६०११५१
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

      उठा, आता तरी जागे व्हा....!

               -- सौ.स्नेहलता कुरणे.
                  मिरज .जि. सांगली.

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 8 मार्चच का ? याला एक मोठा इतिहास आहे. अनादिकालापासून स्त्री आणि पुरुष वर्चस्वाची लढाई सुरू आहे असे वाटते. खरं तर स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूशिवाय दुसरी अपूर्ण, अर्थहीन... स्त्री पुरुष जणू एका शरीराची दोन पावलं. एक पुढे एक मागे..त्याशिवाय चालणं अशक्य. पुढच्याला गर्व नसतो, मागच्याला खंत नसते, मागे -पुढे क्रम बदलता, दोन्ही समान पावलं टाकत चालणं अशक्य. तसेच स्त्री- पुरुष एकमेकांना पूरक, एकमेकांना समजून तडजोड करत आनंदात जीवन जगणं सोपं. अश्मयुगात आनंदात जगतही असतील ; पण नेमकं माहिती नाही... का ? कधी ? काय झाले आणि पुरुषी अहंकाराने डोके वर काढले.. ज्या स्त्री मुळे आपण जग बघू शकलो त्याच स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले.. पुरुषी वर्चस्वासाठी स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व्हायला लागले, स्त्रीला मूलभूत हक्कांपासून, शिक्षणापासून दूर ठेवले गेले, उपभोग्य वस्तू म्हणून स्त्रीचा व्यापार केला गेला.. प्रजोत्पादन, बालसंगोपन आणि अविरत कष्ट करावे आणि मरावे इतकंच स्त्रीचं आयुष्य बनलं... तिला हीन वागणूक मिळत असताना तिने त्याविरुद्ध आवाजही उठवायची बंदी होती.
19 व्या शतकात मात्र जगभरात या गुलामी विरुद्ध काही बंडखोर स्त्रिया संघर्ष करू लागल्या. मेरी वोलस्टन क्राफ्ट, एलिझाबेथ, कँडी, कॅरोलिना ऐगान..भारतात गार्गी, मैत्रेयी इ.बंडखोर स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला..न्यूयार्क येथे
हजारो कामगार ,कष्टकरी स्त्रियांनी रस्त्यावर उतरून स्वतःच्या हक्कांसाठी 8 मार्च 1908 रोजी लढा पुकारला. संघटितपणे केलेल्या या ऐतिहासिक लढ्याची दखल घेऊन 1910 च्या कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जगभर 8 मार्च हा दिवस महिलांना त्यांच्या न्याय, हक्काबाबत आठवण करून देतो...
भारतातही हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होतो. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती' म्हणत मनु ने स्त्रियांना शिक्षणापासून वंचीत ठेवले परंतु 'जिचे हाती पाळण्याची दोरी ;ती जगाची उद्धारी.. असे म्हणत क्रांतीबा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. फातिमा शेखने ही धुरा सांभाळली. पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्त्रियांचे हक्क कायद्याने सुरक्षित केले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, धोंडो केशव कर्वे अश्या अनेक महापुरुषांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आयुष्य वेचले. पण आज 21 व्या शतकातही अनेक स्त्रिया गुलामीचे जीवन जगत आहेत, अन्याय अत्याचार वाढले आहेत, स्त्रीभ्रूण हत्या केली जात आहे. हुंडाबळी जात आहेत. रूढी परंपरांच्या जोखडाखाली स्त्रिया दबलेल्या आहेत. शिक्षण घेतलं, अर्थार्जनासाठी घराबाहेरही पडल्या परंतु स्वातंत्र्य मिळत नाही. आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न करू दिलं जात नाही, विधवांना हळदी कुंकू समारंभात बोलावलं जात नाही. विधवा पुनर्विवाह क्वचित होतात. अन्याय खपवून न घेणाऱ्या, स्वतंत्र वागणाऱ्या स्त्रियांना कुलटा, व्यभिचारी ठरवलं जातं, पुरुषप्रधान मानसिकतेतून मुलगाच हवा म्हणून जास्त मुलींना जन्माला घातलं जातं किंवा स्त्रीभ्रूण हत्या केली जाते, परिणामी आई बनलेली स्त्री कमकुवत होते, तिचे आरोग्य ढासळते, जीवाला धोका उत्पन्न होतो परंतु तिच्या तब्बेतीपेक्षा मुलगा होणं प्रतिष्ठेचं असतं. घरातील सर्व काम स्त्रीनेच करावी हा अट्टाहास असतो
घरी येणारी सून हक्काची मोलकरीण आहे असं समजलं जातं.
हे सर्व केंव्हा थांबणार ? फक्त महिला दिन साजरा करून, भाषणं करून, लेख लिहून, वाचून, स्त्रीमुक्तीचा पोवाडा गाऊन स्त्रीमुक्ती, स्त्रीसक्षमीकरण होणार नाही ; तर प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आचार विचारांमध्ये बदल करायला हवा.. मुलाचे संगोपन करताना त्याच्या मनातील पुरुषी अहंकार वेळोवेळी बालवयातच ठेचायला हवा. स्त्रीच्या पोटी जन्म मिळाला म्हणून स्त्रीचा आदर, सन्मान राखण्याची वृत्ती प्रत्येक मुलामध्ये निर्माण करायला हवी. मुलालाही मुलींप्रमाणे स्वयंपाक व तत्सम कामं करण्याची सवय लावायला हवी. मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यायला हवेत. स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक करायला हवं. मुलीला पूर्ण शिक्षण द्यायला हवं. लग्नाची घाई करू नये. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे तिच्या मनावर बिंबवायला हवे..
महिला दिन साजरा करणं म्हणजे पुरुषांना दोष देत द्वेष करणं नव्हे तर स्वतःला सक्षम करणं होय.

*हे स्त्रीये स्वतःला बदल,
जग आपोआप बदलेल.*
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

नोकरी आणि महिला

फार पूर्वीच्या काळी स्त्री आणि पुरूष यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती .आपापल्या प्रांतात ते दोघेही जण कार्यरत होते. परंतु काळ जसजसा बदलत गेला तसतसे काही बदल होणे क्रमप्राप्त ठरले. काळाची गरज म्हणून, स्वत: एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जगण्यासाठी, एक माणूस म्हणून जगण्यासाठी स्त्रियांना नोकरी करणे गरजेचे ठरले. इथूनच त्या नोकरदार स्त्रीची घालमेल, घुसमट सुरू झाली. त्यात तिला जर तान्हे मूल असेल तर मग तर कठीणच. मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे शिक्षण, पै- पाहुणा, वडिलधाऱ्यांच्या जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी घरासाठी करणे आणि त्याच वेळेला नोकरीच्या ठिकाणी सुदधा बौद्धिक कामे, सहकाऱ्यांशी वर्तणूक, वरिष्ठांचा आदर अशी दुहेरी भुमिका वाढली.
         आपली संस्कृती म्हणावी तशी बदलली नाही त्यामुळे स्त्रियांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. घरातील कामे, मुलांचे संगोपन हे प्रामुख्याने स्त्रीचेच काम आहे हे तिच्या मनावर बिंबवले असल्याने तिची घुसमट होत राहते. तिला काही निर्णय योग्य वाटत असून सुदधा जे तिच्या स्वत:च्या प्रगतीसाठी योग्य असून सुद्धा ती घेऊ शकत नाही. जर तिने धाडसाने असे काही करायचे ठरवले तर पहिला संघर्ष होतो तो घरात, नंतर नोकरीच्या ठिकाणी. बरे यातून एखादी धाडसाने पुढे गेलीच तर समाज तिला म्हणतो घरदार वाऱ्यावर सोडून निघाली करिअर करायला. ती अशीच आहे. ती कोणाचीच पर्वा करत नाही.
       अशा वेळेस जेंव्हा ती नोकरीच्या ठिकाणी पुरूष सहकाऱ्यांशी चर्चा करत असेल, विचारांची देवाण - घेवाण करत असेल तर या गोष्टींवर सुदधा तिला मर्यादा येतात. खरे तर ती मोकळेपणाने अनेक विषयावर आपले मत मांडू पाहत असते पण इतर लोकांच्या नजरा तिला हे सुद्धा करू देत नाहीत. मग अनेक लोकं तिच्याबददल काहीबाही बोलू लागतात. अशा विविध प्रकारे तिचे खच्चीकरण झाल्यावर तिच्या पंखांमध्ये बळ कसे निर्माण होणार ?कशी ती गगनभरारी घेणार ? कारण पुरुषांनी तिला गृहितच धरलेले असते मग तो घरचा असो किंवा बाहेरचा. नंतर नंतर तिला हा संघर्षच नको वाटतो. ती थकून जाते आणि स्वत:च स्वत:च्या प्रगतीच्या वाटा बंद करते. तेंव्हा मात्र ती समाजाच्या, घरच्यांच्या नजरेत कौतुकास पात्र ठरते. समाजाला, घरच्यांना तिचा त्याग कधी नजरेस येत नाही. ज्या स्त्रीला पैसे कमवायची अक्कल आहे परंतु तो खर्चायची अक्कल नाही म्हणणारा हा समाज. मग त्याच वेळेस कुठेतरी तिच्या मनात ही जखम कायमचं रुतून बसते की माझ्याकडे पात्रता असतानाही मी केवळ एक स्त्री आहे म्हणून मला आहे त्याच ठिकाणी समाधान मानावे लागले. कदाचित मी जर पुरूष असते तर या उलट घडले असते. मग ती देवाला कायम एकच मागणे मागते पुढचा जन्म तरी मला पुरूषाचा जन्म दे, पण मानसिकता बदललेला पुरूष. जो फक्त स्त्रीला देवी बनवून एकाच ठिकाणी न थांबवणारा असावा. तर त्याने स्त्रीला अशी साथ द्यावी की वाईट विचारांचे निर्दालन करण्यासाठी तिला विविध ठिकाणी संचार करू द्यावा. तरच योग्य तो सामाजिक बदल होऊ शकतो.
सर्वच ठिकाणी असेच घडते असे नाही तर काही ठिकाणी आदरणीय सौ. सुधा मूर्ती यांच्यासारख्या पण काही स्त्रिया आहेत ज्या या गोष्टींना छेदून स्वत: सोबतच इतर लोकांचा भक्कम आधार बनतात. पुरूषांची मानसिकता बदलण्याची वाट बघण्यापेक्षा एक समान विचारांच्या सर्व मैत्रिणी एकत्र येऊन सुद्धा एकमेकींचा उत्कर्ष करण्यासाठी झटलो तरी माझ्या या भावनांचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

श्रीमती अनुराधा जेवळीकर
स. शि. जि. प. प्रा. शा. दाऊतपूर
जि. उस्मानाबाद
••••••••••••°°°°°°°°••••••••••••••

संस्कार करणारी महिला

      या देवी सर्व भुतेशू
      शक्ति रूपेणसंस्थिता
       नमस्तस्ये नमस्तस्ये
       नमस्तस्ये नमो नमः

मा दुर्गादेवीला देखील कमकुवत व सामान्य समजणा-या महिषासुराला जेव्हा मा दुर्गादेवीने यमसदनी पाठवले तेव्हाच सर्वाना प्रचिती आली की, मा दुर्गामाता असामान्य आहे.
"चमत्काराशिवाय नमस्कार नाही" पूर्वापार चालत आलेली बाब.
शिक्षणाचा संस्कार.. समाजातील स्त्री व दलितांवर करणा-या सावित्रीबाई फुलेला आम्ही पाहिले नाही .परंतु जिच्या चालण्या-बोलण्यात, वागण्यात सरस्वती दिसली त्याच सावित्रीबाई फुले परतंत्र भारतात, ज्यानी "स्त्रीमनावर शिक्षणाचा संस्कार केला" त्यामुळेच आज आम्ही तिस-या डोळ्यानी जगाकडे पाहु शकतो
आज जगात प्रत्येक क्षेत्रातील अती उच्च पदावर महिला अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. "प्रामाणिकपणा हा महिलांचा अतिशय जवळचा मित्र आहे" त्यासोबतच त्या धैर्याने आत्मविश्वासाने जगत आहेत व आपल्या आजुबाजुला असलेल्या प्रत्येक स्त्रीला ,व्यक्तीला धाडसाने उभे राहण्यासाठी स्वबळावर स्वतःच्या अस्तित्वाला फुलवण्यासाठी झटत आहेत. भारतात स्त्री शिक्षणाच्या पायाचा हा महत्वाचा संस्कार ज्या सावित्रीबाईनी घातला त्याची आज आपण रोज पूजा करतो हा मान त्याना अनेक दिव्यातून परीक्षेतून त्यागातून उत्तीर्ण झाल्यानंतरच मिळाला आहे. संस्कार ही अशी गोष्ट आहे की त्याचे रोपण महिला करू शकते. पुरूष करत नाहीत असं नाही परंतु निसर्गनियमानुसार
गर्भधारणा स्त्रीमध्येच होत असल्यामुळे जास्त प्रमाणात स्त्रीच संस्कार करू शकते. स्त्री आज एवढी सक्षम झाली आहे की, माझे होणारे बाळ जगाच्या इतिहासात, व्यवहारात शिक्षणात अती उच्चपदाला पोहचले पाहिजे ही कामना ठेवूनच गर्भधारणेपासूनच ती त्या गर्भावर संस्कार करू लागली आहे. ग्रहावर केलेला संस्कार खरोखरच प्रभावी असतो .चांगले विचार आचार संपादन करणे, सतत कार्यमग्न राहणे कार्यतत्पर राहणे, चंचल राहणे एखाद्या कलेची उपासना करणे, मोठमोठ्या थोर संतविभुती, महात्मा याची चरित्रे वाचने एक ना अनेक गोष्टी स्त्री स्वतः आत्मसात करत आहे. कशासाठी ? तर फक्त संस्कार.  संस्कारावर तर हे जग टिकणार आहे .शांत, संयमी, अभ्यासू, धाडसी, धैर्यवान मनोवृत्तीच्या बालकांची संख्या जगात वाढली तर निश्चितच "जग खूप मोठी सुंदर  बाग होईल". जगात सगळीकडे शांतता नांदेल अर्थात महिलानीच हा संस्कारांचा वसा उचलला आहे.
        जन्मानंतर देखील या मुलानी काय करावे ? काय खावे ? काय ऐकावे ? या गोष्टीचे महत्व महिलानाच थोडे जास्त समजते. बालकांच्या मनावर संस्कार कथाचे महत्व काय आहे हे तिच जाणते. तिच्या बोलत असते बाळाला तिच्या बोलण्यातून तिच्या भाषेतून देखील ती नकळत एक संस्कार मुलांवर करत असते. मुलाच्या अभ्यासाच्या वेळा इतर कलागुणाच्या तासांचे वेळापत्रक महिला सांभाळतात अनेकविध क्षेत्रामध्ये मुलांना वाव देतात संधी देतात एक सक्षम ,सबल, संस्कारी
बालक तयार करतात त्याच्या सोबत खेळात अभ्यास एकरूप होतात. "महिलाना स्वतःच्या इच्छाना नक्कीच मुरड घालावी लागते" हे मात्र खरे
"त्यागातून तर संस्कार पिकवायचे आहेत ना"! हीच तर आहे आजच्या जबाबदार स्त्रीची भूमिका आहे ना.
मा जिजाऊ लहानपणापासून बालशिवाला थोरामोठ्याच्या संतविभुतीच्या कथा सांगुन रामायण व महाभारतातील कथा सांगुन शिवबा असा संस्कारी बनवला की, "परस्त्री माते समान ""अशीच आमुची आई असते सुंदर रूपवती ,आम्ही सुंदर झालो असतो वदले
छत्रपती". हा किती मोठा संस्कार आहे. "संस्कार ही अशी शिदोरी आहे ,प्रवृत्ती वाटेत भेटली तरी संस्कार तिला हात लावत नाही"आणि म्हणूनच या काळवटत चाललेल्या  जगात महिलांना संस्कार पेरायचे आहेत नव्हे पेरावे लागणार आहेत. कारण ते काम महिला करू शकणार आहेत.कुठलाही धर्म असु द्या पंथ असु द्या आई ही आईच असते, मुल फक्त आईचेच ऐकत असते. आज जगातल्या प्रत्येक महिलेने जागं झालं पाहिजे व आपल्या मुलांना संस्काराची शिदोरी दिली पाहिजे. तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी कुठल्याही लढाईत हारता कामा नाही.
      आजची महिला सुदृढ मनोवृत्तीची आहे तिने दिलेले संस्कार नक्कीच वाईट प्रवृत्तीला ठेचणारे आहेत. कमी शिकलेली जरी असली तरी चांगल्या वाईटाची जाण तिला आहे. माझं लेकरांनो माझे नाव काढावे हीच तर तिची इच्छा असते. दिवसेंदिवस संस्कारातून मिळणा-या शिक्षणाची प्रगती आज आमच्या डोळ्यासमोर आहे .भारत देश जगाच्या नकाशात मान उंचावत आहे हे सर्व महिलांच्या जबाबदारी त्यागी संस्काराचे
तर परिणाम आहेत ना. धन्य त्या संस्कारी धाडसी महिला ज्यानी भारतमातेसाठी आपल्या पोटचा गोळा शहीद केला. जय हिंद

" महिलांनी केलेल्या त्यागातून
नक्कीच सक्षम पिढी घडेल
वेळ नाही लागणार प्रवृत्ती बदलायला
डोक्यावर संस्कारांचा मुकूट चढेल  "

स्नेहलता कुलथे,
माजलगाव जि. बीड

••••••••••••°°°°°°°°••••••••••••••
नोकरी करणार्‍या महिलांची घालमेल

मधल्या काळात एक लेख वाचण्यात आला, विषय होता 'तुम्ही सुपरवुमन नाहिये आणि असं काही होण्याचा प्रयत्नही करून नका. खरं आहे.
नोकरी करणार्‍या महिलांच्या बाबतीत हे वाक्य खरंच आहे वाटतं.
आजकाल शिकलेल्या मुली घरात बसत नाहीत, आपल्या प्रत्येकालाच माहित आहे. मग काय त्यांच्या आयुष्यात लग्न होईपर्यंत फक्त करिअर, मौजमजा, प्रमोशन, साप्ताहिक पार्टी, सिनेमा, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाणं इ. मग कुणा नातेवाईकांचे लग्न असो मुंज वास्तुशांती, बारसं काहीही असेल तरी उत्तर एकच 'सुटी नाही'.
खरा खेळ सुरू होतो तो लग्नानंतर. नवीन लग्न झालेले म्हणून सासरच्यांना नवीन सुनेला नवीन साड्या (जरीच्या-कपड्यांच्या बाबतीतलं स्वातंत्र्य संपलेलं असतं )
नवीन दागिने घालून प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावायची असते आणि इथूनच सुरू होते 'नोकरी करणार्‍या महिलेच्या मनाची घालमेल'
एकीकडे सुट्टी मिळविण्यासाठी सतरादा बाॅसच्या कॅबिनकडे घेतलेली धाव त्यामुळे येणारा ताण,  काम मागे पडत असल्याची जाणीव आणि दुसरीकडे नवीनच आयुष्यात आलेली सासरची माणसे त्यांना न दुखविण्याची जबाबदारी बरं त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की नवर्‍याला त्या कार्यक्रमांना तू नाही आलास तरी चालेल हे वाक्य, मग डोक्यात विचार येतो नेहमी मीच का?
दुसऱ्याच्या कार्यक्रमाला सुट्टी घ्या हा एक अट्टाहास. मग पुन्हा स्वतःचे कार्यक्रम म्हणजे मंगळागौर, दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्मी, संक्रांत ह्या वेळेस तर घरातील लोक कन्सिडर करणारच. ही सुट्टी घेऊन सगळं व्यवस्थित करणार तसं पाहिलं तर तिलाही वाटतचं असतं, नवनवीन ओळखी वाढवाव्या, सणवार एन्जॉय करावं. छान गोडधोड करावं, खावं, खाऊ घालावं आणि मस्त दुपारी ताणून द्यावं. पण पुन्हा विचार येतो एवढ्या सगळ्यासाठी आपलं इथवर आलेलं करिअर पणाला लावावं?
हा ताण, ही घालमेल कदाचित काय प्रत्येक नोकरी करणाऱ्या महिलेच्या मनात असतेच. बरं एवढ्यावर हा सगळा मांडलेला खेळ संपत नाही मग ती बाळाची ओढ. मग काय ओढताण होते. त्यामुळे येणारा स्ट्रेस, स्ट्रेस यासाठी की आपण प्रेग्नन्सी प्लॅन करावी आणि दिवसच नाही राहिले तर पुन्हा त्यात वेळ गेला आणि
पुढे प्रमोशनची वेळ एकच आली तर आधीची मेहनत गेली सगळी वाया, अरे देवा, म्हणायची वेळ येणारच हे ठरलेलंच आणि सगळं व्यवस्थित पार पडलं तर बाळ झाल्यानंतर त्याची जबाबदारी हा तर आयुष्याचा प्रश्न ?
आधीच नोकरीनिमित्त बाहेर राहीलेले घरापासून-घरच्यापासून दूर. मग सुरूवातीला काही दिवस सासरचे लोक बोलवायचे मग चोवीस तास त्यांचे बोलणे खायचे, उपदेश ऐकायचे. अगदी मग मन घट्ट करून कसे तरी दिवस घालवायचे.
मूलं मोठी झाली की अनावधानाने शाळा, अभ्यास, छंदवर्ग हे सगळं येणारच. यात नवर्‍याची मदत जेमतेम. कसंतरी ऑफीस जाॅईन करायचे की सुरू होतात. मुलांचे प्रोजेक्ट वर्क, पालकांनी मग काय पुन्हा एकदा तारेवरची कसरत, ताण आणि तीच घालमेल.
काय करावं आणि काय सोडावं ही घालमेल काही केल्या संपत नाही. दिसायला सगळं समोर दिसतं पण जवळ गेल्यावर कळतं, मृगजळच ते. स्वतःला पुन्हा समजावयाचे घालमेल बाई घालमेल आणि चालायचं, पळायचं, धावायचं आणि पडलं तरी मेळ घालायचं.
 
अष्टभूजा नारायणी मी
तरी मनी चिंता घरादाराची
कधी जुळून येती गोष्टी
कधी जाती बिघडून
घालमेल ही कधी संपायची मनाची.......!!!!"

सौ.प्रतिमा भास्करराव  देशमुख, शिरूरकर.
मो.9730350008

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष साहित्य

Super 30 साहित्यिक पुरस्कार 2019

नववर्ष शुभेच्छा